✍🏻 प्रेमकुमार बोके
महाराष्ट्र ही प्रबोधन आणि प्रबोधनकारांची भूमी आहे.या भूमीत अनेक प्रबोधनकार जन्माला आले. त्यामुळेच महाराष्ट्राचा सामाजिक आणि वैचारिक पाया भक्कम आहे. याच श्रेणीमध्ये विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात सत्यपाल नावाचा एक प्रबोधनकार जन्माला आला.अतिशय सर्वसामान्य कुटुंबात बहुजन समाजामध्ये जन्माला आलेला सत्यपाल हा मुलगा पुढे कीर्तनकार सत्यपाल महाराज, प्रबोधनकार सत्यपाल महाराज आणि आता प्रबोधनकारांचे प्रबोधनकार म्हणून नावलौकिकास आला आहे.सध्याच्या काळात सत्यपाल महाराज हे नाव माहीत नाही असे महाराष्ट्रात एकही गाव नसेल.एवढी लोकप्रियता आणि प्रसिद्धी सत्यपाल महाराजांना त्यांच्या प्रबोधनामुळे मिळालेली आहे.16 मे 1956 हा सत्यपाल महाराजांचा जन्मदिवस अर्थात प्रबोधन दिन ! अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यात सिरसोली या गावात जन्माला आलेले सत्यपाल महाराज राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांनी प्रेरित होऊन भजन,कीर्तनला सुरुवात करतात. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी आपल्या खंजरी भजनाच्या माध्यमातून स्वातंत्र्य आंदोलनात आणि स्वातंत्र्यानंतर फार मोठे कार्य केले आहे.तोच खंजरी भजनाचा वारसा सत्यपाल महाराजांनी पुढे चालवत एका खंजरी पासून सात खंज-या वाजवत आपल्या किर्तनाला एक वेगळे स्वरूप प्राप्त करून दिले. म्हणूनच सप्तखंजरी वादक अशी पदवी सुद्धा लोकांनी त्यांना बहाल केली आहे.सत्यपाल महाराजांपासून प्रेरणा घेऊन अनेक सप्तखंजरी वादक कीर्तनकार तयार झाले आहे आणि ते सुद्धा अतिशय अभिमानाने आपल्या नावासमोर ‘पाल’ ही उपाधी लावून प्रबोधनाचे काम करतात.हे सर्व ‘पाल’ सत्यपाल महाराजांचा प्रबोधनरुपी वारसा पुढे नेण्याचा कसोशीने प्रयत्न करीत आहे.
कीर्तनाच्या क्षेत्राने सध्या व्यावसायिक स्वरूप धारण केलेले असताना आणि कीर्तनातून जातीयता,धर्मांधता,अंधश्रद्धा निर्माण करण्याचे प्रयत्न होत असताना सत्यपाल महाराज मात्र या गोष्टीपासून फार वेगळे आहे.सामाजिक भान आणि जाण ठेवून गाडगेबाबांचा समाजशील कीर्तनाचा वारसा त्यांनी जपलेला आहे.गाडगेबाबा ज्याप्रमाणे बहुजन समाजाच्या उद्धाराचा विचार रात्रंदिवस आपल्या कीर्तनातून मांडत होते;तीच परंपरा सत्यपाल महाराज पुढे चालवत आहे.भुकेलेल्यांना अन्न,तहानलेल्यांना पाणी,उघड्या नागड्यांना वस्त्र, गरीब मुला-मुलींचे शिक्षण,निराधारांना आधार ही गाडगे बाबांची पंचसूत्री सत्यपाल महाराज आपल्या कीर्तनात प्रत्यक्ष कृतीतून अंगीकारताना आपणास दिसून येते.निराधार,अनाथ,आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवा महिला यांना महाराज दररोज आपल्या कीर्तनात साडीचोळी देऊन त्यांचा सन्मान करतात.त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी मानसिकदृष्ट्या प्रोत्साहन आणि बळ देतात. कीर्तनातील लहान मुलामुलींना वैचारिक पुस्तकांचे वाटप करून त्यांच्यामध्ये शिक्षणाचे महत्त्व प्रतिबिंबित करतात.त्यामुळे लहान मुला मुलींना महाराजांचे कीर्तन खूप आवडते.त्यांचे कीर्तन ऐकण्यासाठी लहान मुले सर्वात आधी समोरच्या रांगेत येऊन बसतात.
सत्यपाल महाराजांच्या कीर्तनाचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक कीर्तनातून अखंडपणे जातीय- धार्मिक सलोखा प्रस्थापित करणे.किर्तन सुरु असताना महाराज हिंदू,मुस्लिम,बौद्ध समाजाच्या लोकांना जवळ बोलावून एकमेकांच्या हातून सत्कार करून घेतात आणि सर्वांनी गुण्यागोविंदाने राहण्याचे आवाहन करतात.तरुणांना व्यसनमुक्तीचे आवाहन करून व्यसने सोडवितात.सध्याच्या काळात लोकांना ज्या गोष्टींची नितांत गरज आहे त्याच गोष्टी कीर्तनात सांगतात. बुवाबाजी,अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या निरर्थक गोष्टींना त्यांच्या कीर्तनात अजिबात थारा नसतो. महाराजांचे कीर्तन पूर्णतः विज्ञानवादी,परिवर्तनवादी, समतावादी विचारांचे असते. जातीयता,धर्मांधता यावर ते प्रचंड प्रहार करतात.छत्रपती शिवराय,फुले शाहू,आंबेडकर व आपल्या खऱ्या संतांचे पुरोगामी विचार हा त्यांच्या कीर्तनाचा पाया असतो.त्यामुळे इतर किर्तनकारांपेक्षा सत्यपाल महाराजांचे कीर्तन खूप निराळे असून लोकांच्या जीवनात प्रकाश आणि परिवर्तन निर्माण करणारे असते.
सत्तर वर्षाच्या वयातही कीर्तन करताना त्यांच्यामध्ये असणारी चपळता,समयसूचकता,समोर बसलेल्या हजारो लोकांवर असलेले नियंत्रण,तीन तास जागेवरून कोणालाही हलू न देण्याची क्षमता व कला यामुळे सत्यपाल महाराजांची लोकप्रियता अजूनही कमी झालेली नाही.महिन्यातील एकही तारीख खाली नसणारे ते महाराष्ट्रातील एकमेव प्रबोधनकार आहे.परंतु आपली कीर्तनाची कला स्वतःपुरती मर्यादित न ठेवता अनेक कीर्तनकार तयार करून आज त्यांनी ते गेल्यानंतरही महाराष्ट्राच्या प्रबोधनाची व्यवस्था करून ठेवली आहे.हे त्यांचे महाराष्ट्रासाठी सर्वात मोठे योगदान आहे.संत तुकाराम, वैराग्यमूर्ती गाडगेबाबा आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा वैचारिक प्रबोधनाचा वारसा चालविणाऱ्या या महान आधुनिक संतास बहुजन समाजाचे प्रबोधन करण्यासाठी उदंड आयुष्य लाभो आणि त्यांना लवकरात लवकर महाराष्ट्र भूषण देण्याची सरकारला सद्बुद्धी येवो हीच त्यांच्या जन्मदिनी म्हणजेच प्रबोधन दिनी मनःपूर्वक सदिच्छा.








