एकूणच संतपरंपरेने आपल्या आत्मानुभवातून भक्ती मार्ग प्रशस्त केला .श्री नामदेव -ज्ञानदेवांनी उभा केलेला हा भक्ती प्रपंच ! महाराष्ट्राच्या बहुतांश भूभागात संतांचे प्रमाणमूल्य जोपासत होता .पण
इंग्रज भारतात आले . ते सत्ताधिश झाले . तसा त्यांचा सांस्कृतिक क्षेत्रातला हस्तक्षेप वाढला . त्यांच्या
नवसंशोधनाच्या आणि नव्या सुधारणांच्या उजळ वाटांवर भारतीय धर्मपीठ थरथरले ! या सांस्कृतिक आक्रमणाविरुद्ध लढण्याऐवजी धर्म सांभाळून ठेवणारी मंडळी ,इंग्रजांच्या प्रशासकीय सत्तेतच सहभागी झाली . तर दुसरीकडे या नव सुधारणांचा मेळ आपल्या धर्म जागरणाशी जुळवण्याचा प्रयत्न झाला . त्यात रामकृष्ण मिशन , ब्राह्मो समाज ,आर्य समाज आणि सत्यशोधक समाजाने त्यासाठी नवे मन्वंतर घडवून आणले .
पण इंग्रजांच्या या सांस्कृतिक आक्रमणा विरुद्ध , थेट एकाकी एकट्याने शिलेदारी करणारे एक नाव येते, ते म्हणजे संत गुलाबराव महाराज ! अमरावती जिल्ह्यातल्या सातपुडा पर्वतरांगाच्या व पूर्णा नदिच्या आवर्तनात वसलेलं एक लहानसं गाव .माधान !
या गावात मोहोड आडनावाच्या कृषीवलांची वस्ती . त्यांचीच पाटीलकी .गावकीचा कारभार सांभाळणाऱ्या शिवपूजक असलेल्या गोंदूजी मोहोड यांना ६ जुलै १९८१ रोजी पुत्ररत्न झालं . ते गुलाबराव महाराज !
त्यांना बालपणीच अंधत्व आलं. लौकिक अर्थानं उपेक्षीत असणाऱ्या आडवळणाच्या गावात, .धर्म आणि शिक्षणाचा कोणताही संस्कार नाही . वय, विद्या, सुबत्ता आणि दृष्टी या सर्व बाबतीत या बालकाचं अपंगत्व ! तरिही दयेच्या भरवशावर भिकेच्या बाजारात हे अपंगत्व कधीच उभं राहीलं नाही . अलौकिक असं स्वयंसिद्ध सामर्थ्य हे त्यांना
अभिजात प्रतिभेनं दिलं होतं . कायम ग्रंथासक्त असलेल्या या तरुणानं भारतीय धर्मशास्त्र आणि पाश्चात तत्वज्ञान लिलया पालथं घातलं . त्यासाठी आपलं अंधत्व बाजूला सारत , वाचून देणारी आणि लिहून काढणारी माणसं सोबतीला घेतली . प्रत्येक ग्रंथावर आपली मतं ठरवली . समिक्षा केली आणि अफाट साहित्य ऊभं राहीलं . एखाद्या धूमकेतूच्या आकस्मिक तेजाने दीपून जावं अगदी तसं या प्रकाशमान साहित्याच्या उजेडात भले भले दीपून गेले ! सूत्रग्रंथ, भाष्यग्रंथ, आकार ग्रंथ, शास्त्रग्रंथ, भक्ती ग्रंथ, योग, सांख्य, संगीत, आर्युवेद, प्रकरण ग्रंथ, अभंग गाथा, निबंध, संवाद, लोकगीते, स्तोत्रे , चरित्र / आख्याने अशी सर्वस्पर्शी साहित्य रचना ! या सर्व ग्रंथाची संख्याही कमी नाही ? १३३ आहे . त्यात लघुलीपी सदृश अशा नावंग भाषेचाही समावेश आहे . स्पेन्सर, डार्वीन अशा पाश्चात विद्वानांचा परामर्शही या ग्रंथात घेतला आहे .आपल्या ग्रंथनिर्मितीच्या कार्यात ज्या लेखनिकांनी मदत केली त्यांच्याप्रती वाचकं लेखकं वंदे अशी नम्र कृतज्ञता व्यक्त करत , अवघ्या वयाच्या चवतीसाव्या वर्षी हा प्रज्ञासूर्य मावळला .
पुण्याच्या चाकण ऑईल मिल परिसरात २० सप्टेंबर
१९१५ रोजी त्यांचा लौकिक देह सरला .
॥ ज्ञानेश्वर कन्या ते मधुराव्दैत संप्रदाय ॥
माधान आणि परिसरात महानुभाव संप्रदायाचा मोठा
प्रभाव होता . वारकरी संप्रदायाचा इकडे मागमूसही नव्हता .अशा स्थितीत श्री महाराजांना माऊलींचा स्वप्नात अनुग्रह झाला . हे नाते घट्ट झाले . ते स्वतःला ज्ञानेशकन्या संबोधू लागले . पण इथे त्यांनी ज्ञानदेवांना माऊली ऐवजी तात म्हटले . भक्तीचे नवविध प्रकार त्यांना माहित असतांनाही, सर्वांत श्रेष्ठ असणाऱ्या माधुर्य भक्तीला त्यांनी कात्यायनी व्रताच्या निमित्ताने नवे परिमाण दिले . भक्त आणि भगवंत / स्त्री आणि पुरुष यात व्दैत नाही . संपूर्ण विसर्जन !
यासाठी त्यांनी मधुराव्दैत संप्रदायाची स्थापना केली .
ज्ञानदेव पीता आणि कृष्ण पती ! ही भाव संकल्पना ऊभी करून, हा संप्रदाय त्यांनी पुढे नेला . ज्ञानोत्तर भक्तीची ,भक्तीशास्त्राला त्यांनी दिलेली ही अमूल्य देणगी आहे . श्रीशंकराचार्य यांच्यावर पूज्य बुद्धी व त्यांच्या तत्वज्ञानाचा दबदबा असतानाही महाराजांनी आचार्यांच्या अध्यस्त विवर्त सिधांतात विनम्र अधिक्षेप करून, अनध्यस्त विवर्त पुढे आणले . हे महाराजच करू जाणे ! जगापासूनच्या विरक्ती शिवाय ब्रम्ह प्राप्ती नाही . हे आचार्यांचे मत ! त्यासाठी त्यांनी दिलेले दोरी आणि सापाचे उदाहरण प्रसिद्ध आहे . पण सर्वसामान्य जीवाला मायेचा तिरस्कार करून भागत नसते . अलंकार आणि सुवर्ण हे जसे वेगळे नाहीत तसे ब्रम्ह आणि मायेचे नाते असते ! असा फेरफार करून स्वतःचा अनध्यस्त विवर्त सिधांत त्यांनी मांडला .मधुरा भक्तीचे पारमार्थिक प्रयोजन करण्यासाठी खरं तर हा संप्रदाय त्यांनी ऊभा केला . पण आपला संप्रदाय वारकरी संप्रदायाच्या अगदी जवळचा असून , हवे तर त्याला उपशाखा म्हणावी ! असा त्यांचा आग्रह आहे . या संप्रदायात ब्रम्हचारी व संन्यासाना त्यांनी प्रवेशबंदी केली आहे . केवळ गृहस्थी भक्तांसाठीच या संप्रदायाचे प्रयोजन आहे .
॥ श्री महाराजांचा वारकरी अनुबंध ॥
पीत्याचे ते धन । पुत्रा वंचील ते कोण ॥ हे ज्ञानेश्वर माऊलींचे वचन आहे . श्री महाराजांचं वारकरी असणं काय किंवा नसणं काय ? ते खुद्य ज्ञानेश्वरांची कन्या असल्यामुळे, वारकरी संस्कारधन त्यांना वारसा हक्कानं मिळालं आहे .वारकरी पंथ हा धर्मभेदांचा नाश होऊन सद्गती देणारा पंथ आहे . नव्हे तो पंथ नसून तो विश्वधर्म होईल ! असं भाकीतही त्यांनी करून ठेवले आहे . मी कोणत्याही पंथाचा अभिमानी नसलो तरी शहाणा असा हाच पंथ मला मान्य आहे . हा शहाणपणा कसा आहे ? त्याचे विश्लेषण करताना ते म्हणतात
आक्षेपार्ह अशी गुरु शिष्य परंपरा या पंथात नाही .
या पंथाने गादी स्थापन केली नाही .निरनिराळ्या देवतेंचे उपासक या पंथात होऊन गेले आहे .नरहरी सोनार महाशैव जनार्दन -एकनाथ दत्तभक्त ,भानुदास सूर्यउपासक , तात – तुकाराम आदी वैष्णव .हे सर्व या पंथाचे अध्वर्यु झाले आहेत .शिवाय नाथादी ब्राह्मण , तुकारामादी कुणबी , शेख महंमद मुसलमान रोहिदास चांभार , चोखामेळा महार , कान्होपात्रा वेश्या या सुद्धा या पंथाच्या अनुयायी झाल्या आहेत . तद्वतच मुक्ताबाई सारख्या ब्रह्मचारीणी व जनाबाई सारख्या दासी या पंथात समत्वाला आल्या आहेत . शिवाय नामदेवांची लालन भक्ती व विश्वंभरादिकांचे वात्सल्य आणि मुक्तकेशी आदी बायांचे माधुर्य या पंथात एकवटले आहे . म्हणून हा पंथ शहाणा आहे .
आणखी एक ! श्री महाराजांचा अनुबंध जोडणारी
एक ठळक बाब अधोरेखीत करणारी आहे .आज जे माऊलींचे फेटाधारी चित्र आपण पाहतो . त्या प्रतिमेची संपूर्ण संकल्पना श्री महाराजांची आहे . अकोल्यातील एका चित्रकाराकडून ते त्यांनी काढून घेतले होते . ते वारकरी संप्रदायाने प्रमाण चित्र म्हणून स्विकारले आहे .
मामासाहेब दांडेकर / केशवराव देशमुख आणि ल .रा . पांगारकर हे श्री गुलाबराव महाराजांचे समकालीन होते . मामासाहेबांचे व महाराजांचे संबंध वाचनात आले नाहीत .पण केशवराव देशमुख आणि श्रींचा संबंध आला होता . ज्ञानेश्वर सुत या नावाने ओळखले जाणारे केशवराव यांनी नारद भक्ती सूत्रावर सुंदर विवरण केले आहे . हा ग्रंथ त्यांनी श्री महाराजांना अर्पण केला आहे . या दोहोंनी पुण्यातील लकडी पुलाजवळील खंडोजी बाबा यांच्या समाधी मंदिराजवळून विठ्ठल वाऱ्या केल्याच्या नोंदी आहेत .
पांगारकर हे श्री महाराजांच्या बुद्धी वैभवासमोर पूर्णतः नतमस्तक झाले होते . त्यांच्या अनेकदा चर्चा होत असे . श्रींच्या निर्वाणानंतर मा. त्रिपुरवार यांनी लिहलेल्या चरित्राला पांगारकरांचीच प्रस्तावना होती . हा अनुबंध अधिक स्पष्ट करता आला असता . पण विस्तार भयास्तव थांबतो .
अलिकडे वारकरी संप्रदायात रामदासी संप्रदायाचे अतिक्रमण वाढले आहे . वारकरी संत साहित्याला न्यूनता दाखवण्याची बौद्धिक दिवाळखोरी समोर आली आहे . श्री गुलाबराव महाराजांच्या बाबतीतही
तेच घडते आहे . त्यामुळे श्री महाराजांचा वारकरी अनुबंध सैल न सोडता तो घट्ट केला पाहिजे .
॥ धर्मद्रष्टा धर्मसमन्वय महर्षी ॥
**********************
रज आणि तम गुणांचा नाश होऊन सत्वगुणांची वाढ होईल त्यालाच आपण धर्म म्हणतो . अशी धर्माची तार्किक आणि सुंदर व्याख्या श्री महाराजांनी केली आहे . जगातले सर्व धर्म या एकाच पायावर उभे आहेत . ईश्वर मानणारे हिंदू /इस्लाम / ख्रिश्चन आणि ईश्वराचे अस्तित्व नाकारणारे जैन आणि बौद्ध या सर्व धर्मांचा मूळांश सत्वगुणांची वाढ करणे इतकाच आहे
सर्व धर्मातील उपासना या वेगळ्या असल्या तरी एकाच शक्तिच्या त्या याचना करतात . मोक्ष किंवा मुक्तीसाठीचा तो आग्रह आहे ! आपले निष्कर्ष बिनचूक होण्यासाठी अनेक उदाहरणे देऊन ते त्यांनी स्पष्ट केले .
धर्माधर्मातील वैर हे धर्माच्या कोणत्याही पायाभूत आधारावर नाही . राजकीय लोक जेव्हा धर्माचा वापर करतात तेव्हा धर्माधर्मामध्ये भांडणे होतात . हे त्यांनी ठोसपणे प्रतिपादित केले . छत्रपती शिवाजी महाराज आणि औरंगजेब यांची लढाई ही कुठेही धार्मिक नव्हती ती राजकीय लढाई होती . उपासना /आहार / विहार कसा करायचा ? हा त्या – त्या धर्माचा अंतर्गत मापदंड आहे .त्यावर बंधने लादण्याचा परस्परांना काय अधिकार आहे ? हेही त्यांनी नमूद केले आहे .
प्रत्येक धर्माचा आशय एकच आहे तो म्हणजे माणसाचा लौकिक विकास आणि अध्यात्मिक उन्नयन ! यासाठीच धर्माचे प्रयोजन आहे .सर्व धर्मातील समान धागे पकडून त्यांना एकत्र करणे म्हणजे धर्म समन्वय . तुझ्या आणि माझ्या धर्मात सारखेपणा आहे . समजून घे ! हा महाराजांचा आग्रह आहे . आपल्या सव्दैजयंती स्तोत्रात त्यांनी अब्दुल मिया / अलीमिया / ताजुद्दीन बाबा / कादरभाई / पापामिया / मीयासाहेब / शेखबाबू इत्यादींना वंदन केले . हि त्यांची धर्मसमन्वय दृष्टी आहे . शेवटी
राम रहीमा करीमा केशव
अलखनाम सब एकही है
जिसको तुम बिस्मिल्ला कहते
वही बिष्णु हमारा है
असंही त्यांचं सांगणं आहे . पण अलिकडे काही विद्वत प्रचारकी लोक श्री महाराजांच्या या धर्म समन्वय सूत्राला बाद करून , धर्मसमभाव ही संकल्पनाच पागलपण असल्याचे जाहीर करतात . कारण त्यांना हिंदू विरुद्ध मुस्लीम करण्यातच स्वारस्य असते .तेंव्हा अशा विद्वानांची किव येते .
॥ बुवाबाजीचे पोस्टमार्टम करणारा संत ॥
सामान्य साधकांच्या भक्ती प्रपंचात तथाकथीत भोंदूना वाटमारी करण्याची संधी असते ! हे संतांनी ओळखले होते . नामदेव . ज्ञानदेव आणि नाथांनी वेळोवेळी ही भोंदूगीरी दाखवत सावध केले आहे . तुकोबांनी तर आक्रमकपणे अशा वाटमाऱ्यांवर हल्ला केला आहे . विसाव्या शतकात आपलं जीवीत कार्य करीत असतांना, श्री गुलाबराव महाराजांना ही भोंदू जमात अवती भोवती दिसली ! ती जशी लफंग्या बुवात होती ,तशी वेदांतावर प्रवचणे झोडणाऱ्यातही
त्यांना दिसली ! म्हणून त्यांनी या बुवाबाजीचे सर्व पोस्टमार्टमच केले .संस्कृत वेत्ते सामान्य माणसापर्यंत
खऱ्या धर्म भक्तीचे विचार पोहचू देत नाहीत . त्यासाठी त्यांनी प्रश्नकदंब नावाचा मराठीत ग्रंथ लिहला आणि सावध केले . हा ग्रंथ त्यांनी सहृदय तुकोबांना अर्पण केला . –
मूर्ख साधूंचे करावया कंडण ।
प्रश्नकदंब चालवा पुढे ।
तयांची फजिती करू आम्ही ।
हे बोलिले शांतही तुकाराम स्वामी ॥
जो धर्म ज्यावेळी जितका दंभ सोडून चालतो तितका त्याचा जय होतो ! भक्ती प्रांतात आर्त आणि अर्थार्थी असा भक्त समुदाय असतो . भौतिक अभुदय आणि दुःख मुक्ती करण्याचा त्यांचा प्रयास असल्याने असे भक्त कधीच परमार्थिक असत नाही ! त्यांची मुमुक्षू भक्त होण्याची इच्छा नसते . अशा भक्तांना गंडवण्याचा प्रयत्न हे चमत्कारी बाबा आणि पोपटपंची करणारे वेदांती करीत असतात .म्हणूनच अशा मठ्ठ भक्तांना सावध करण्यासाठी श्रींनी आपल्या ग्रंथात त्याचे विवेचन केले आहे .
१) बुवाबाजीचे स्वरूप २) भोंदूगीरीचे २४ प्रकार 3)भोंदूंचे आत्म समर्पण ४)दोषदृष्टीचा उपयोग व बारा प्रश्न ५ ) फसविणारे साधू ६ ) वेदांताचे विडंबन व निच गुरुवर्ग ७) फसवणूक आणि निती यासोबतच वेदांताची प्रवचने झोडणाऱ्या प्रोफेसरांनाही त्यांनी ५५ प्रश्न विचारून भंडावून सोडले आहे . शेवटी –
नाना चमत्कार नोहे हा प्रसाद ।
जेणे होय बोध संसाराचा ॥
सध्याचे वर्तमान , बुवा साधूंच्या बाबतीत भयावह आहे .श्री महाराजांचा विचार प्रखरपणे मांडण्याऐवजी
पर्चीवाले बाबा आणि बेलपत्रीवाले बाबा आपल्या संतभूमीत हैदोस घालत आहे . त्यात श्री महाराजांवर प्रवचने झोडणारे महाभाग सामील आहेत ! हे दुर्देव आहे .
शेवटी श्री महाराजांचं साहित्य हे सर्वस्पर्शी आहे .
पण या साहित्याला आकार देणारी लेखनिक मंडळी शास्त्रसंमत अभिजन वर्गातली होती . त्यांच्याविषयी अत्यंत कृतज्ञता असूनही , त्यांच्या प्रकुर्तीचा स्पर्शही या साहित्याला आहे ! हे कबूल केलं पाहिजे .म्हणूनच श्री महाराज चार्तुवर्णाचे पक्षधर आहेत .असे आक्षेप येतात . पण महाराजांचं हे चार्तुवर्ण हे गीता आणि ज्ञानेश्वरीच्या मांडणीतलं आहे . हेही समजून घ्यावे लागेल . आज श्री महाराजांना वर्णश्रेष्ठत्वासाठी वापरण्याचे एक षड्यंत्र सुरू आहे .अशावेळी बहुजन समाजातील चिंतकांनी इकडे लक्ष्य द्यावे ! आमचे तरुण मीत्र आणि अभ्यासक हभप . ज्ञानेश्वर बंडगर महाराज आमच्या या विचार प्रवासाचे सहसोबती होत आहेत . याचा आनंद आहे .
पंकज आवारे / श्रीक्षेत्र माधान
ता . चांदूर बाजार / जि. अमरावती
मोबा . 9764889083







