तळवेल : प्रतिनिधी
श्री बाबाराव सार्वजनिक शिक्षण संस्था, तळवेल अंतर्गत कार्यरत पाचही शाळांतील मुख्याध्यापक व शिक्षकांनी राज्यातील आदर्श आणि जागतिक दर्जाच्या शैक्षणिक संकल्पनांसाठी प्रसिद्ध असलेल्या जालिंदरनगर व वाबळेवाडी शाळांचा प्रेरणादायी अभ्यास दौरा केला. या दौऱ्याचा उद्देश आधुनिक, विद्यार्थी-केंद्रित शिक्षणपद्धतीचा प्रत्यक्ष अनुभव घेऊन आपल्या शाळांमध्येही त्याची प्रभावी अंमलबजावणी करणे हा होता.
दौऱ्यादरम्यान शिक्षकांनी शाळांमध्ये राबविण्यात येणाऱ्या विविध नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रमांची, विद्यार्थ्यांच्या कृतीशील शिक्षणाची, आनंददायी वर्गव्यवस्थापनाची, परिसर विकासाची, शाळा व्यवस्थापनाची तसेच शिक्षक-विद्यार्थी सहभागातून उभारलेल्या गुणवत्तापूर्ण शैक्षणिक वातावरणाची सखोल पाहणी केली.
यावेळी जागतिक दर्जाच्या शाळा उभारणीचे शिल्पकार व राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित शिक्षक दत्तात्रय वारे गुरुजी यांनी शिक्षकांना मार्गदर्शन करताना, “शाळेचा दर्जा केवळ इमारतीवर अवलंबून नसून शिक्षकांची सकारात्मक मानसिकता, विद्यार्थीकेंद्रित दृष्टिकोन आणि सातत्यपूर्ण प्रयत्न यांमधूनच उत्कृष्ट शाळा निर्माण होते,” असे प्रतिपादन केले. त्यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनामुळे उपस्थित शिक्षकांमध्ये आपल्या शाळांमध्येही परिवर्तन घडविण्याची नवी ऊर्जा निर्माण झाली.
या अभ्यास दौऱ्यानंतर श्री बाबाराव सार्वजनिक शिक्षण संस्था, तळवेल अंतर्गत असलेल्या पाचही शाळांनी जालिंदरनगर आणि वाबळेवाडीच्या धर्तीवर आपल्या शाळा विकसित करण्याचा निर्धार व्यक्त केला.
हा अभ्यास दौरा समन्वयक मयुर चौधरी यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीपणे पार पडला. यावेळी राजाभाऊ देशमुख व जयश्री देशमुख यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. दौऱ्याचे संयोजन डॉ. तुषार देशमुख व विशाल देशमुख यांनी केले.
या अभ्यास दौऱ्यात मुख्याध्यापक विनोद तिरमारे, राजेंद्र कुमरे, विद्या मेश्राम, राजेश वानखेडे, सोपान पळसपगार, निशिकांत पाटील तसेच संस्थेतील सर्व शिक्षक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले.
या प्रेरणादायी अभ्यास दौऱ्यामुळे शिक्षकांना आधुनिक शिक्षणाच्या नव्या दिशा मिळाल्या असून, ग्रामीण भागातही जागतिक दर्जाच्या शाळा उभारण्याच्या दिशेने संस्थेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.











