



लोकनेते भय्यासाहेब देशमुख जयंती व राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात संपन्न
तळवेल : शंकर विद्यालय, तळवेल व श्री गो. अ. देशमुख स्मृती प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने लोकनेते कै. भय्यासाहेब दादा देशमुख जयंती व राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त विद्यार्थी सन्मान दिनाचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री बाबाराव सार्वजनिक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. राजाभाऊ देशमुख होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त प्राचार्य डॉ. हनुमंत लुंगे माजी मुख्याध्यापक शालिकराम बोन्डे उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. हनुमंत लुंगे यांनी, “खेळाडूंचे भविष्य कायम उज्वल असते. विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबतच क्रीडा क्षेत्रातही सातत्याने प्रयत्न करून आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास साधावा,” असे प्रतिपादन केले. खेळामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, आत्मविश्वास, संघभावना व नेतृत्वगुण विकसित होतात, असेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमात खो खो,सेपक टकरा या क्रीडा प्रकारांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. तसेच गरजू व गुणवंत विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रातील प्रगतीला प्रोत्साहन देण्याचा हा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे उपस्थित मान्यवरांनी सांगितले.
लोकनेते कै. भय्यासाहेब दादा देशमुख यांच्या सामाजिक, शैक्षणिक कृषी आरोग्य व विद्यार्थीहिताच्या कार्याचे स्मरण करून त्यांच्या विचारांचा व कार्याचा आदर्श विद्यार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहन यावेळी अध्यक्ष राजाभाऊ देशमुख केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ तुषार देशमुख प्रास्तविक मुख्याध्यापक राजेश वानखडे व जीवन परिचय श्रीधर भोकसे यांनी तर आभार भाष्कर काळे यांनी मानले.आयोजनासाठी शंकर विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास विद्यार्थी, पालक, शिक्षक व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.







