समाजशील नेतृत्व राजाभाऊ दादा देशमुख, तळवेलकर
आमचे मार्गदर्शक राजाभाऊ दादा देशमुख यांचा आज वाढदिवस. गेल्या अनेक वर्षांपासून हा वाढदिवस आम्ही वेगवेगळ्या उपक्रमांनी साजरा करत असतो. युवक मार्गदर्शन, रक्तदान शिबिर, रोगनिदान शिबिर, व्याख्यान, जल जागृती कार्यशाळा असे अनेक उपक्रम आम्ही राबवितो. दादांना वाढदिवसापेक्षा त्यादिवशी लोकांचे प्रबोधन, जागृती व्हावी असे वाटते. पोस्टर, बॅनर यापेक्षा समाजाला आपण काहीतरी देणे आहोत या भावनेतून कृतियुक्त कार्यक्रम होणे त्यांना अपेक्षित आहे.
राजाभाऊ दादांनी आजपर्यंत जिल्हा बँक, राज्य बँक, श्री शिवाजी शिक्षण संस्था, हार्ट हॉस्पिटल, विविध सहकारी संस्था यावर मोठी पदे भूषवली आहेत. परंतु या सर्व पदातून समाजाचं हित साधणे हाच कायम त्यांचा स्थायीभाव राहिला आहे.
पर्यावरण हा त्यांचा आवडता विषय, जल पुनर्भरण करण्यासाठी त्यांच्या मार्गदर्शनात घाटलाडकी सारख्या आडवळणाच्या गावात प्रयोग यशस्वी झाले. त्याचप्रमाणे सीताफळ प्रक्रिया मार्गदर्शन, हवामान बदलासंदर्भात वेळोवेळी शेतकरी मार्गदर्शन शिबिर आम्ही आयोजित करतो.
आमच्या संस्थेचे अध्यक्ष असणारे राजाभाऊ दादा संस्थेतील पाचही शाळेत विविध विद्यार्थिभिमुख उपक्रम राबविण्यासाठी आम्हाला नेहमी मार्गदर्शन करीत असतात. यावर्षी पासून आम्ही प्रसिद्ध दत्तात्रय वारे गुरुजी यांच्या मार्गदर्शनात शाळा समृद्धी अभियान सुरु केले आहे.कृषी, सहकार, सामाजिक, पर्यावरण, जल जागृती, स्वच्छता अशा अनेक विषयांचा दादांना व्यासंग आहे. त्यांचा राज्यभर मित्रपरिवार आहे. सर्वच पक्षात त्यांचे चाहते आहेत. त्यांचे वडील लोकनेते, माजी आमदार स्व. भय्यासाहेब दादा देशमुख यांच्या विचारांवर कायम त्यांनी कार्य केले आहे.
त्यांचाच वसा घेऊन विद्यार्थी सन्मान दिन, वृद्ध सन्मान दिन, महिला मार्गदर्शन, वैचारिक शिवजयंती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आदी कार्यक्रम दरवर्षी आम्ही राबवतो. त्यांना अपेक्षित कार्य पूर्ण करण्यासाठी त्यांना जिजाऊ उदंड आयुष्य देवो हीच प्रार्थना…….
● डॉ. तुषार अ. देशमुख,सचिव,दी नरसिंग शिक्षक सहकारी पतसंस्था तळवेल










